आचारसंहिता मुळे टोल च्या दरात होणारी वाढ थांबविण्यात आली
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 3 : “पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एप्रिल पासून टोलच्या दरात करण्यात आलेली दरवाढ आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून थांबविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही नवीन टोल दरवाढ लागू करण्यात येईल,” अशी माहिती पुणे सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.
त्यामुळे लोकसभा निवडणुका होईपर्यंत तरी प्रवाशांना टोलदरवाढीपासून दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्याचे टोलचे दर दरवर्षी एप्रिल महिन्यात कमी जास्त होत असतात. त्यानुसार यावर्षीही 1 एप्रिलपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोलचे दर बदलेले होते. बदललेल्या दरानुसार खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोलच्या दरात सुमारे अडीज टकक्यांनी टोलवाढ लागू करण्यात आली होती. मात्र सध्या देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वाढीव टोल दरवाढ थांबविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी वाहन चालकांना पुर्विचाच टोल द्यावा लागणार आहे.
याबाबत पुणे सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने टोलची एप्रिलपासून वाढविण्यात आलेली दरवाढ थांबवली आहे. त्यामुळे तूर्तास तरी प्रवाशांकडून जुन्या दराने टोल वसूल केला जाईल. नवीन टोल दरवाढ लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लागू होईल.”