‘कुलदीप कोंडे’ यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
कोंडे यांच्या महायुतीतील प्रवेशाने भोरच्या मतदानाची गणिते बदलणार
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 18 : भोर तालुक्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परीषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकला असून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कुलदीप कोंडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. दोन वेळा त्यांनी शिवसेनेकडून भोर विधानसभा मतदार संघातून आमदार संग्राम थोपटे यांना कडवी टक्कर दिली आहे. मात्र शिवसेनेत फूट झाल्यानंतर कोंडे यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले होते. गेल्या काही सभांमध्ये कोंडे हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत दिसत होते. मात्र भोरच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुळे यांनी आमदार थोपटे यांना उघड पाठींबा जाहिर केला होता. त्यामुळे कुलदीप कोंडे हे नाराज होते. त्यामुळे ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.
अखेर कोंडे यांनी आपल्या नाराजीवर वाट काढत गुरुवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोंडे यांचा शिवसेना शिंदे गटात झालेला प्रवेश हा सुप्रिया सुळे म्हणजेच महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत कुलदीप कोंडे म्हणाले, “इतर पक्षात राहून मी आजपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्या मागे असलेले कार्यकर्ते, भोरची जनता यांची अडकलेली कामे मार्गी लागावीत, त्यांच्या विविध समस्या सूटल्या पाहिजेत, यासाठी मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात जोमाने उतरणार आहे.”