पुणे सातारा रस्त्यावर अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर उलटला
पुणे सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 23 : पुणे सातारा रस्त्यावर शिवरे (ता.भोर) गावात अल्कोहोल वाहतूक करणारा एक टँकर मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पलटी झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र पुणे सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून टँकर बाजूला घेण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अल्कोहोल वाहतूक करणारा एक टँकर पुण्याच्या दिशेने निघाला होता. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा टँकर शिवरे गावच्या हद्दित आला. यावेळी येथील उड्डाणपूलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या वळणावर अंदाज न आल्याने सदर टँकर येथे पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र पहाटे तीन वाजल्यापासून पुणे सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सातारा पुणे रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर अनेक वाहन चालक उलटया बाजूने गेल्याने पुणे-सातारा रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली आहे.
चार क्रेन, आणि अग्निशामक बंबाच्या सहाय्याने सदर टँकर बाजूला घेण्याचे काम सुरु आहे. मात्र टँकर अल्कोहोलने भरलेला असल्याने बाजूला घेणे मोठे अवघड झाले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बाजूने पर्यायी रस्ता करून वळविण्याचे काम सुरु आहे. महामार्ग पोलिस, राजगड पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक येथील वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत.