“राजगड तालुक्यातील एकनिष्ठ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी”… दीपक दामगुडे तालुकाप्रमुख
पुणे फास्ट 24 न्यूज
भोर, ता. 4 : शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या दत्ता देशमाने यांच्यासोबत बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते गेले आहेत. त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निष्ठेने काम करू,” अशी प्रतिक्रिया राजगड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेत व्यक्त केली आहे.
भोरमधील उद्धव ठाकरे गटाचे कुलदीप कोंडे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर राजगड तालुक्यातील माजी तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी सुद्धा नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र काही मोजकेच कार्यकर्ते देशमाने यांच्याबरोबर गेले असून तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असे दामगुडे यांनी सांगितले.
राजगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख दीपक दामगुडे म्हणाले ,’माजी तालुकाप्रमुख दत्ता देशमाने यांच्या सहित बोटावर मोजण्या इतकेच शिवसैनिक गेल्याने तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना कोणताही फरक पडणार नसून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहून महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे काम निष्ठेने करणार आहेत. निवडणुका आल्यानंतर व यात्रेत ढोल वाजल्यावर ज्यांच्या अंगात येते, असे कार्यकर्ते देशमाने यांच्यासोबत शिंदे गटात गेले आहेत. पक्षाने दोन वेळा जिल्हा परिषदेचे तिकीट देऊन तसेच सात वर्ष तालुकाप्रमुख पद देऊनही पक्ष बदलला आहे. देशमाने यांना पक्ष बदलणे नवीन नाही.”
तर शिवाजी खुळे म्हणाले, ‘कट्टर शिवसैनिक हा कठीण कालावधीमध्ये कधीही डळमळत नसून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असून गद्दारांना कधीही क्षमा करणारा शिवसैनिक असू शकत नाही.’
अठरा गाव मावळ केळद परिसर विभागाचे विभाग प्रमुख तानाजी धुमाळ म्हणाले, ‘मी कायम खऱ्या शिवसैनिकांसोबत असून माझी निष्ठा कायम आहे.
यावेळी उपतालुकाप्रमुख नितीन भोसले ,उमेश नलावडे, शिवाजी खुळे, लक्ष्मण कडू तसेच विभाग प्रमुख बाळासाहेब पिलावरे, राम खरात, राजेंद्र डिंबळे, तानाजी धुमाळ ,आप्पा शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.