गतिमंद मुलाला गायब केल्याची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
पुणे फास्ट 24 न्यूज
खेड-शिवापूर, ता. 5 : “चार ते पाच जणांनी माझ्या मुलाला मारहाण करून त्याला गायब केल्याची तक्रार देण्यासाठी मी पोलिसात जात आहे. मात्र पोलिस फक्त मुलाला मारहाण केल्याची तक्रार घेत आहेत. उद्या माझ्या मुलाला काही कमी-जास्त झाले तर त्याला पोलिस आणि मारहाण करणारे जबाबदार असतील,” अशी संतप्त प्रतिक्रिया गायब मुलाचे वडील गोविंदलाल विश्वकर्मा यांनी व्यक्त केली.
याबाबतची माहिती अशी की, गोविंदलाल विश्वकर्मा यांचा 19 वर्षाचा मुलगा नटवरलाल विश्वकर्मा हा गतीमंद आहे. 28 एप्रिल रोजी सायंकाळी साडे चार वाजल्यापासून तो वेळू येथील घराजवळ खेळत असताना अचानक दिसेनासा झाला. त्यामुळे 29 तारखेला गोविंदलाल यांनी त्यांचा मुलगा गायब असल्याची तक्रार पोलिसात दिली. मात्र दोन दिवसांनी शेजारील हॉटेल चालक, एक महिला आणि हॉटेल चालकाचे कामगार यांनी माझ्या मुलाला गायब होण्याच्या चार दिवस अगोदर बेदम मारहाण केली होती. त्यांनीच माझ्या मुलाला गायब केले असल्याची तक्रार देण्यासाठी गोविंदलाल शिंदेवाडी पोलिस चौकीत गेले. मात्र पोलिसांनी मुलाला गायब केल्याची तक्रार न घेता फक्त मुलाला मारहाण केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
गोविंदलाल विश्वकर्मा म्हणाले, “ज्यांनी माझ्या मुलाला मारहाण केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या मारहाण करणाऱ्यांनीच माझ्या मुलाला गायब केले आहे. मात्र ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर माझ्या मुलाला गायब केल्याचा गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी माझी मागणी आहे. मात्र पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत. उद्या माझ्या मुलाचे काही कमी जास्त झाले तर त्यास पोलिस आणि त्याला मारहाण करणारे जबाबदार असतील.”
याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.