तीन दिवस झालेत तो नित्यनेमाने येतोय
पाऊस कोसळतो आहे, ऋतू कुस बदलतो आहे
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 20 : गेले तीन दिवस झाले आहेत. सायंकाळचे बरोबर सहा वाजले की तो येतो. तो आला आला म्हणेपर्यंत मेघगर्जना आणि वादळ वाऱ्यासह जोरदार कोसळतो. रस्त्यावर, ओढया-नाल्यात पाणी-पाणी करतो. क्षणात वातावरणातील उकाड्याची जागा गारवा घेतो. तो म्हणजे दूसरा तीसरा कोणी नाही, तीन दिवस झालेत नित्यनेमाने खेड-शिवापूर भागात अवकाळी पाऊस बरसतोय.
गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदललंय. अवकाळी पाऊस पडत असून ते ऋतू बदलाची चाहूल देत आहे. त्यामुळे दुपारपर्यंत वातावरणात कमालीचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा, असे वातावरण सध्या झालेय. गेल्या आठ दिवसांपासून अधे-मध्ये अवकाळी पाऊस पडले आहेत. पण गेल्या तीन दिवसांपासून तो नित्यनेमाने बरोबर सायंकाळी सहा वाजले की येतो. मेघगर्जना आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळतो. अवघ्या काही वेळात पाणी-पाणी करतो. नुसती मेघगर्जना ऐकली की भागातून वीज बाई पळून जाते. ते थेट रात्री उशीराच हजर होते.
अवकाळी पावसाच्या या तीन दिवसाच्या नित्यनेमाने धरणी शांत झाली आहे. मात्र वादळ वाऱ्यामुळे झाडे, विजेचे खांब, घरे-गोठे यांचे नुकसान होत आहे. तोडणीला आलेल्या आंबा पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ होत आहे. अशा प्रकारे तीन दिवस झाले अवकाळी पाऊस खेड-शिवापूर भागाला झोडपतो आहे. कवी किशोर कदम यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ऋतू कुस बदलतो आहे.