उठा उठा सकाळ झाली, वीज जाण्याची वेळ झाली
महावितरणच्या अनियोजित कारभारावर नागरीक त्रस्त
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 20 : “उठा उठा सकाळ झाली वीज जाण्याची वेळ झाली,” अशी परिस्थिती शिवगंगा खोऱ्यातील नागरीकांची झाली आहे. वळवाच्या पावसाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना महावितरणच्या अघोषित भारनियमनला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.
गेले काही दिवस शिवगंगा खोऱ्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. रात्री पाऊस पडून गेल्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतो आहे. या उकाड्याने नागरीक अक्षरक्ष हैराण झाले आहेत. त्यातच महावितरणचे या भागात अघोषित भारनियमन सुरु आहे. त्यामुळे या उकाड्यात अजूनच भर पडते आहे. गेल्या आठ दिवसांपासून सकाळी नऊ ते दहा वाजताच वीज पुरवठा खंडित केला जातो. ते दुपारी काही वेळ वीज येते. पुन्हा फक्त आभाळ भरून आले तरी वीज पुरवठा खंडित केला जातो. महावितरणच्या या अघोषित भारनियमनामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता विजेचा भार नियंत्रित करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचा फटका फक्त गोगलवाडी आणि गाउडदरा या दोन गावांनाच बसतो आहे. त्यामुळे विशेषतः या दोन गावातील नागरीक जास्त त्रस्त झाले आहेत.