टोल देऊनही वाहतूक कोंडीचा मनस्ताप
पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर येथे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 23 : पुणे सातारा महामार्गावर टोल देऊन प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. येथील दर्गा फाट्यावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाशेजारील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी दर्गा फाट्यावर सुरु झालेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरु झाले त्यावेळी वाहतूक सुरळीत सुरु होती. मात्र गेल्या आठ दिवसात पडलेल्या पावसामुळे येथील सेवा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणारी वाहतूक संथ होत आहे. त्यामुळे रोज सकाळी येथे वाहतूक कोंडी होत आहे. दर्गा फाटा ते पाठीमागे सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे रोज सकाळी प्रवाशांना येथील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्लम खतीब म्हणाले, “उड्डाणपूलाच्या कमाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सबंधित ठेकेदाराला येथील खड्डे बुजविण्यास अनेकदा सांगितले आहे; मात्र तरीही खड्डे बुजवले जात नाहीत.”
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंकित यादव म्हणाले, “सबंधित ठेकेदाराला खड्डे बुजविण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसात येथील संपूर्ण खड्डे बुजविण्यात येतील.”