देशवासियांसाठी आनंदाची बातमी
मान्सून केरळात दाखल; 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होणार
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 30 : पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून (मोसमी नैऋत्य वारे) केरळ आणि ईशान्य भारतात गुरुवारी (30 मे) दाखल झाला आहे. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
दरवर्षी साधारणतः 2 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यावर्षी मात्र तीन दिवस अगोदर म्हणजेच 30 मेलाच मान्सून केरळात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी केरळ आणि ईशान्य भारतातील राज्यात मान्सून एकाच वेळी दाखल झाला आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर 15 जूनपर्यंत संपूर्ण देशभरात पसरतो. महाराष्ट्रात मान्सून यावर्षी 10 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशवासियांसाठी ही आनंदाची बातमी असून लवकरच मान्सून देशभरात सर्वत्र हजेरी लावणार आहे.