बारामतीत ‘मोठे साहेब’च ‘पॉवरफुल’
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 7 : अत्यंत लक्षवेधी आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत साहेब आणि दादा यांचे अस्तित्व पणाला लागले होते. मात्र अखेर बारामतीचा गड आपल्याकडे कायम ठेवत बारामतीत आपणच पॉवरफुल असल्याचे मोठे साहेब म्हणजेच शरद पवार यांनी दाखवून दिले.
बारामतीचा गड काबीज करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टिकडून अनेकदा करण्यात आला आहे. यावेळी तर पवार घराणे फोडून पवार घराण्यातील उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देऊन भाजपाने नवी खेळी खेळली. पवार कुटुंबातील नणंद आणि भावजयीमध्ये ही लढत असल्याने ही लढत लक्षवेधी ठरली होती. संपूर्ण देशाचे लक्ष बारामतीच्या या लढतीकडे लागले होते. तसेच राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर या लढतीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांचे अस्तित्व पणाला लागले होते. बारामतीत मोठे साहेब की दादा यापैकी नक्की कोण पॉवरफूल? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला होता. मात्र अखेर मोठ्या साहेबांनी बारामतीचा गड काबीज करत बारामतीत आपणच पॉवर फूल असल्याचे दाखवून दिले.
राजकारणातील नाट्यमय घडामोडीमुळे लोकांमध्ये नाराजी
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार भाजपा सोबत गेले. तसेच बारामतीत दुसरा कोणी उमेदवार देण्याऐवजी भाजपाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली. या सर्व घडामोडी बाबत लोकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी लोकांनी मतदानातून व्यक्त केली.
सुळे यांना सहाही मतदार संघात लीड
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच शिवसेना पक्षात फुट झाल्याने यावर्षी बारामती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात कोणाला किती मताधिक्य मिळेल, याबाबत निश्चित सांगता येत नव्हते. मात्र खडकवासला वगळता इतर पाचही मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी मताधिक्य घेतले.
विधानसभा मतदार संघ आणि मिळालेले मताधिक्य
भोर (सुप्रिया सुळे)- 41,625
बारामती (सुप्रिया सुळे)- 48,168
पुरंदर (सुप्रिया सुळे) -34,387
इंदापूर :(सुप्रिया सुळे) -25,689
दौंड (सुप्रिया सुळे)- 24,267
खडकवासला (सुनेत्रा पवार) – 21,696
सुप्रिया सुळे यांना मिळालेली एकूण मते-7,32,312
सुनेत्रा पवार यांना मिळालेली एकूण मते-5,73,979
सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य- 1,58,333