‘पुणे फास्ट 24 न्यूज’च्या बातमीची दखल
पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांची प्रशासनाकडून पाहणी; आवश्यक उपाययोजना करण्याच्या संबंधितांना सूचना
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 13 : वेळू (ता. भोर) येथील सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी येऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची भीती असल्याचे वृत्त ‘पुणे फास्ट 24 न्यूज’ने दाखवले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने या भागाची सविस्तर पाहणी केली. तसेच रस्त्यावर पाणी येऊ नये, यासाठी सबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
पावसाचे पाणी वेळू (ता.भोर) येथील पुणे सातारा रस्त्याच्या सेवा रस्त्यावर येऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. 2013 साली शिंदेवाडी (ता. भोर) येथेही डोंगरावरील पाणी रस्त्यावर येऊन दुर्घटना घडली होती. वेळू फाट्यावरील सेवा रस्त्यावरही बाजूच्या कंपन्याची नसलेली ड्रेनेज व्यवस्था तसेच डोंगरावरील पावसाचे पाणी वाहून नेण्याचे मार्ग बंद झाल्याने येथील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर सेवा रस्त्यावर येते. या पाण्यामुळे सेवा रस्त्यावर पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त ‘पुणे फास्ट 24 न्यूज’ने दाखवले होते.
त्याची दखल घेत बुधवारी प्रशासनाने या भागाची पाहणी केली. भोरचे तहसीलदार सचिन पाटील, वेळूच्या मंडल अधिकारी प्रभावती कोरे, ‘एनएचएआय’ आणि ‘रिलायन्स इन्फ्रा’चे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी या भागाची पाहणी करून तसेच रस्त्यावर पाणी येण्याची कारणे शोधून सबंधितांना आवश्यक त्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
याबाबत भोरचे तहसिलदार सचिन पाटील म्हणाले, “अनेक ठिकाणी ओढे बुजविण्यात आले आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात येतील. या भागातील कंपन्यांची ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर येते. या पाण्याच्या योग्य उपाययोजनेसाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), ‘एनएचएआय’, ग्रामपंचायत यांना पत्राद्वारे सूचना करण्यात येतील.”