विना नंबर प्लेट दुचाकीस्वारांचा सुळसुळाट
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 18 : नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्या पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर परीसरात गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. विशेषतः अशा प्रकारे नंबर प्लेट नसलेले दुचाकीस्वार पुणे शहरातून या भागात येत आहेत. दुचाकीला नंबर प्लेट न लावण्याचे कारण काय? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
आजकाल दुचाकी ही सहज उपलब्ध होणारी गोष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगार चोरी वगैरे करण्यासाठी गुन्ह्यात दुचाकीचा वापर करतात. परंतु दुचाकीचा नंबर मिळाला तरी त्यावरून दुचाकीच्या मालकापर्यन्त पोचता येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेड-शिवापूर परीसरातील रस्त्यावर नंबरप्लेट नसलेल्या दुचाकींची संख्या वाढली आहे. हे नंबर प्लेट नसलेले दुचाकीस्वार विशेषतः शहर भागातून या भागात येतात. त्यातही विशीतील तरुणांची संख्या जास्त आहे.
हे दुचाकीला नम्बरप्लेट नसलेले दुचाकीस्वार धोकादायक ठरू शकतात. कारण दुचाकी नंबर प्लेट न लावता रस्त्यावर दुचाकी चालविण्याचे कारण काय? हा मोठा प्रश्न यनिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण अनेकदा या नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर पाठिमागे तरुण मूली असतात. त्यामुळे अशा नंबर प्लेट नसताना वाहने दामटणाऱ्या महाभागांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले, “विना नम्बरप्लेट वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई साठी पथक नेमण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”