सेवानिवृत्त मुख्याध्यापकांकडून शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

पुणे फास्ट 24 न्यूज
खेड-शिवापुर, ता. 23 : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून ज्ञानार्जन देण्याचे काम केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप साबळे यांच्या वतीने विविध शाळेमध्ये गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले असून त्यांचा हा उपक्रम भोर, मुळशी, पुरंदर, बारामती येथे साबळे राबवत आहे.
सोमेश्वरनगर ( ता. बारामती ) येथील सोमेश्वर विद्यालयाचे माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप साबळे यांनी कापूरहोळ, नसरापूर, खेडशिवापूर येथील शिवभूमी तसेच मुळशी येथील कोळवन येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. पी. जगताप, सेवानिवृत्त उपनिरीक्षक बनकर, नसरापूर शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. शिंदे, शिवभूमी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, कापूरहोळ येथील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रत्येक लहान मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन वह्या विषयी आकर्षण म्हणून नव्हे तर त्यांना जास्तीच जास्त फायदा व्हावा यासाठी ज्या – ज्या ठिकाणी ज्ञानार्जन केले त्या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवत असल्याचे दिलीप साबळे यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी शिक्षक दिलीप साबळे सर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. दिलीप साबळे सर यांच्या उपक्रमाबाबत इयत्ता दहावीतील सिद्धी दळवी आणि शार्दुल रसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी प्रास्ताविक, शिक्षिका मंजू कोंडे यांनी बहारदार सुत्रसंचालन केले तर पर्यवेक्षिका सविता भरगुडे यांनी आभार मानले.