अखेर स्थानिक नागरीकांनीच बुजविले खड्डे
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 12 : पुणे सातारा रस्त्याच्या सेवा रस्त्याची खेड-शिवापूर परिसरात अक्षरशः चाळण झाली आहे. सध्या पाऊस उघडला असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे अखेर स्थानिक नागरीकांनीच जेसीबीच्या सहाय्याने खड्डयात मुरुम टाकून खड्डे बुजवले.
गेल्या काही दिवसात जोरादर पाऊस झाला. या पावसाने पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथील सेवा रस्त्याची तर खड्डयांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डयातून वाट काढताना वाहन चालकांची दमछाक होत आहे. अनेक लहान चारचाकी वाहने खड्ड्यांमुळे जामिनीला घासून वाहनांचे नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थ्यांची या रस्त्यावरुन ये-जा करताना गैरसोय होत आहे.
त्यातच सध्या पाऊस उघडला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे वैतागून अखेर येथील सेवा रस्त्यावरील खड्डे स्थानिक नागरीकांनी जेसीबीच्या सहाय्याने बुजविले. त्यामुळे आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना जाग येईल का? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.
याबाबत रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी राकेश कोळी म्हणाले, “लवकरच खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. पहिल्यांदा खड्डे बुजविण्यात येतील. त्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल.”