पुण्यात ससाणेनगर येथे पोलिसावरच कोयत्याने हल्ला
कर्तव्य दक्ष पोलीस एपीआय रत्नदीप गायकवाड हल्ल्यात जखमी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 25 : ससाणेनगर (पुणे) येथे दोन दुचाकीवरील तरुणांमध्ये सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार रविवारी घडला. त्यात वानवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी निहालसिंग मन्नू टाक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वानवडी पोलिसांनी माहिती दिली. रविवारी दुपारी चार वाजन्याच्या सुमारास ससाणेनगर येथील रेल्वे गेटजवळ दोन दुचाकी वरील तरुणांमध्ये भांडण सुरु होते. त्यातील एका तरुणाकडे कोयता होता. यावेळी वानवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तेथून चालले होते. यावेळी त्याठिकाणी थांबून गायकवाड त्यांची भांडणे सोडवून त्यांच्याकडील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी त्यातील निहालसिंग मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता गायकवाड यांना फेकून मारला. या कोयत्याने गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून आरोपी पळून गेले आहेत.
याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.