हवेली पोलिस ठाणे खेड-शिवापूरला येणार?

0

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर
, ता. 5 : पुणे ग्रामीणच्या हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच गावे पोलिस आयुक्तालय, पुणे शहर यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या सोईनुसार राजगड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलिस चौकीच्या अंतर्गत येणारी 11 गावे हवेली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात यावी. तसेच हवेली पोलिस ठाण्याचे मुख्यालय खेड-शिवापूर येथे उभारण्यात यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. आमदार भीमराव तापकीर यांनीही याबाबतचा प्रस्ताव पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना पाठवला आहे.

Advertisement


सध्या हवेली पोलिस ठाण्याअंतर्गत असलेली नांदेड, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदोशी, खकडवासला या गावांचा पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हवेली पोलिस ठाण्याची हद्द कमी झाली आहे. तर दूसरीकडे पूर्वी हवेली पोलिस ठाण्याअंतर्गत असलेली खेड-शिवापूर पोलिस चौकी सध्या राजगड पोलिस ठाण्यात वर्ग आहे. मात्र खेड-शिवापूर पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या 11 गावांना राजगड हद्दीत प्रशासकीय कामे करण्यासाठी गैरसोय होत आहे. राजगड ठाण्याचे प्रशासकीय, महसूल आणि न्यायालयाचे कामकाज भोरमध्ये चालते. तर खेड-शिवापूर चौकीअंतर्गत असलेल्या गावांची न्यायालयीन, महसूल आणि इतर प्रशासकीय कामे हवेली तहसीलमध्ये करावी लागतात. त्यामुळे खेड-शिवापूर चौकी अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांची त्यामुळे गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर हवेली पोलिस ठाण्यात खेड-शिवापूर पोलिस चौकी वर्ग करावी, आणि हवेली पोलिस ठाण्याचे मुख्यालय खेड-शिवापूर येथे उभारावे, अशी मागणी होत आहे.
आमदार भीमराव तापकीर म्हणाले, “हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांचा पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश झाला आहे. त्यामुळे हवेली पोलिस ठाण्याची हद्द कमी झाली आहे. म्हणून हवेली पोलिस ठाणे खेड-शिवापूरला घेऊन जावे. जेणेकरून हा भाग विकसित होतो आहे. त्यासाठी खेड-शिवापूर येथे हवेली पोलिस ठाणे आल्यास सोईचे ठरेल. प्रशासकीय कामकाजाची सुद्धा गैरसोय होणार नाही. त्यामुळे हवेली पोलिस ठाणे खेड-शिवापूरला उभारण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले, “खेड-शिवापूर परीसर झपाट्याने वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर हवेली पोलिस ठाणे खेड-शिवापूर येथे उभारावे. सदर ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता येण्यासाठी हवेली पोलिस ठाणे खेड-शिवापूर येथे यावे, अशी आमची मागणी आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!