शिवापूरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे लोकार्पण
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 13 : शिवापूर (ता. हवेली) ग्रामपंचायतीत प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन आणि ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा उदघाटन आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट आणि देसाई इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सहकार्याने हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे आता शिवापूर ग्रामपंचायतीच्या जमा झालेल्या ओला आणि सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन होणारच आहे. शिवाय त्यातून इंधन आणि बायोगॅस निर्मितीही होणार आहे.
यावेळी शिवापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रोटरी क्लब ऑफ पुणे, टिळक रोड यांचे मार्फत उभारण्यात आलेल्या शौचालय यूनिट आणि फिल्टर प्लांटचे उदघाटन करण्यात आले.
देसाई इलेक्ट्रॉनिक कंपनीचे संचालक विक्रमभाई देसाई, केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रत्नाकर उर्फ शिरीष नीळकंठ फडतरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय दिघे, उपसरपंच राजाभाऊ सट्टे, किरण ठाकुर, सतीश दिघे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.