सेवा रस्त्याला कोणी वाली नाही
अनेक महिन्यांपासून दुरुस्तीचे काम रखडले
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 13 : मोठ-मोठे खड्डे, पसरलेली खडी, त्यावरून वाहने घसरून होणारे अपघात, उडणाऱ्या धूळीमुळे धोक्यात आलेले नागरीकांचे आरोग्य अशी अवस्था पुणे सातारा रस्त्यावरील वेळू फाटा ते दर्गा फाट्यादरम्यानच्या सेवा रस्त्याची झाली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या सेवा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना मुहूर्त मिळालेला नाही.
पुणे सातारा रस्त्यावर पुण्याकडे जाणाऱ्या बाजुकडील दर्गा फाटा ते वेळू फाट्यापर्यन्त रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. या खडीवरुन घसरून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. तर या रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशी या सेवा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र तरीही या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा लक्ष देत नाहीत.
येथील रस्त्याच्या कामासाठी नवीन ठेकेदार नेमण्यात येणार असून दोन दिवसांत हे काम सुरु होईल, असे रिलायन्स इन्फ्राचे राकेश कोळी यांनी सांगितले होते. मात्र आता अनेक दिवस झाले तरी या रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील सेवा रस्त्याला कोणी वाली उरला नसल्याचे मत नागरीक व्यक्त करत आहेत.