…आणि ते पुन्हा आलेच!
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 4 : ‘मी पुन्हा येईन’ असे ते म्हणाले होते आणि ते पुन्हा आलेच. भारतीय जनता पार्टीच्या विधी मंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार; हे स्पष्ट झाले असून मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी (ता.5) देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधी होणार आहे.
23 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात महायुतीला भरभरून यश मिळाले. सरकार स्थापनेसाठी आवश्यक आकडा महायुतीने पार केला. त्यामुळे ताबडतोब नवीन सरकार अस्तित्वात येऊन शपथविधी होईल, असे वाटले होते. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आणि सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबला.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीत यासंदर्भात बैठक झाली. दिल्लीहून आल्यावर एकनाथ शिंदे यांनी थेट सातारा जिल्ह्यातील आपले दरे गाव गाठले. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांनी मुंबईत आल्यावर पुन्हा महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका सत्र सुरु झाले. मुख्यमंत्री पद, गृह आणि अर्थ खाते याभोवती या बैठका सुरु होत्या. मुख्यमंत्री पद नाही दिले तर गृहमंत्रीपदाची शिंदे गटाने मागणी केली. मात्र मुख्यमंत्री आणि गृह खाते फडणवीसच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले. अखेर बुधवारी दुपारी भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ नेतेपदी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे स्पष्ट झाले आहे.
गुरुवार (ता.5) मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री पद तर आपल्याकडे ठेवण्यात भाजप यशस्वी झाले आहे. आता कोणती महत्वाची खाती कोणाला मिळतात आणि कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.