गुईलेन बॅरे सिंड्रोमसाठी शासकीय रुग्णालयांत विशेष व्यवस्था

मुबई, ता. २८: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराबाबत सविस्तर आढावा घेतला. शासकीय रुग्णालयांमध्ये या रुग्णांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत या आजारावर उपचार समाविष्ट आहेत. हा आजार दूषित पाणी आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे नागरिकांनी दूषित पाणी आणि न शिजवलेले अन्न टाळावे आणि पाणी उकळून प्यावे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती करावी. तसेच आणखी काही आवश्यक प्रक्रिया असल्यास आरोग्य विभागाने ती तातडीने राबवावी. ३१ जानेवारी रोजी पुण्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले.
बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले. पुण्यात सध्या 111 रुग्ण आहेत, यापैकी 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकांची चाचणी पूर्ण झाली असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची (NIV) मदत घेतली जात आहे. पुण्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, मात्र तो जीबीएस मुळेच झाला का, याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातील केस गळती समस्या नियंत्रणात असून, सध्या नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. याबाबत अंतिम निर्णयासाठी आयसीएमआरच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही उपयुक्त माहिती आणि सूचना दिल्या.