महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 हून जास्त भाविक जखमी, अमृत स्नान रद्द

0

I मोठी बातमी l

प्रयागराज,ता.२९: महाकुंभ मेळ्यादरम्यान मौनी अमावस्येनिमित्त संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला आहे. अमृत ​​स्नानसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली आहे. ही गर्दी इतकी जास्त होती की, काही क्षणातच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णवाहिकेने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे.
महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले. यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत कुठूनही मृत्यूची बातमी नाही. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
महाकुंभात देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा ओघ सुरूच आहे. आज मौनी अमावस्या आहे. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी आहे. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी सुमारे 10 कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. अशात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नानचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांमध्ये परत बोलावल्या आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवलं जात आहे. जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रातील सर्व भाविक सुरक्षित

महाकुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातून देखील हजारो भाविक प्रयागराजला दाखल झाले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त अखिल भारतीय वारकरी संप्रदाय खालसा (माऊली धाम ) मध्ये सुरक्षित आहेत. श्री रघुनाथ महाराज (देवबाप्पा) फरशीवाले बाबा यांच्या आखाड्यात सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्त सुरक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!