वरंधा घाट दोन महीने वाहतुकीसाठी बंद राहणार
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 26 : वरंधा घाटातून प्रवास करणारे पर्यटक आणि प्रवासी यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती आणि दुर्घटना टाळण्यासाठी वरंधा घाटात आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी 26 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्ध केले आहे.
पावसाळ्यात वरंधा घाटात दरडी कोसळणे आणि इतर नैसर्गिक आपत्ती येतात. त्यामुळे घाटात दुर्घटना घडण्याची भिती असते. गेल्या आठवड्यात या भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यानंतर प्रशासनाने या घाट रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी पावसाने वरंधा घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तसेच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर घाटात दरडी कोसळू नये, तसेच इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वरंधा घाटात आवश्यक दुरुस्ती आणि उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी 26 जून ते 31 ऑगस्टपर्यंत वरंधा घाट अवजड, मध्यम व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याच कालावधीत भारतीय हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कालावधीत वरंधा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्ध केले आहे. तसेच सबंधित शासकीय विभागांना याबाबत कळविण्यात आले आहे.