महामार्ग आणि राजगड वाहतूक पोलिसांना टोलनाका सूटेना
कोंढणपूर फाट्यावर वाहतूक कोंडीचा बोजवारा
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 18 : दररोज सकाळी- संध्याकाळी कोंढणपूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा प्रवाशांसोबत स्थानिक नागरीकांनाही मोठा त्रास होत आहे. मात्र महामार्ग पोलिस आणि राजगड वाहतूक पोलिस यांना टोलनाका सुटत नसल्याने येथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणा उपस्थित नसते. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पुणे सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाटा वर्दळीचे ठिकाण आहे. बाजारपेठ आणि शिवगंगा खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणारा हा मुख्य फाटा आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ रोज याठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. येथील अनेक व्यावसायिकांच्या टपऱ्या रस्त्यावर आहेत. अनेक व्यावसायिकांना स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही. येथील उड्डाणपूलाखाली अनेक वाहने उभी असतात. या सर्व गोष्टीमुळे येथून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कोंढणपूर फाट्यावर वाहतूक कोंडी होते. सर्वात जास्त त्रास पीएमपी बसला येथे वळताना होतो. अशा पद्धतीने कोंढणपूर फाट्यावर रोज वाहतूक कोंडीचा बोजवारा उठत आहे.
मात्र येथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिस उपस्थित नसतात. त्याचे कारण म्हणजे महामार्ग पोलिस आणि राजगड वाहतूक पोलिसांना टोलनाका काही सूटत नाही. टोल नाक्यावर वाहनांवर कारवाई करण्यात महामार्ग आणि राजगड वाहतूक पोलिस मग्न असतात. त्यामुळे त्यांना येथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे कोंढणपूर फाटा ते शिवापूर पोलिस चौकीपर्यंत ही वाहतूक कोंडी होते. त्याचा प्रवाशांसोबत स्थानिक नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.