हवेली तहसील कार्यालयात चहा-पाण्यासाठी नागरीकांची अडवणूक
हरवलेल्या फायली शोधल्या म्हणून कर्मचारी मागतात चहा-पाणी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 19 : हवेली तहसील कार्यालयात चिरीमिरीसाठी नागरीकांची अडवणूक केली जात आहे. तहसिलदार साहेबांनी सही केलेल्या त्यांच्या टेबलवरील फाईल हरवल्याचे सांगून येथील कर्मचारी सबंधित नागरीकांना तीन-तीन महीने चकरा मारायला लावत आहेत. या प्रकारामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेतील का? असा सवाल नागरीक विचारत आहेत.
नावातील बदलाची नोंद प्रमाणित करण्याचे प्रतिज्ञापत्र हवेली तहसील कार्यालय यांच्या न्यायालयात होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी सबंधित अर्जदाराने प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र त्यानंतर येथील तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी तुमची फाईल हरवली असल्याचे सांगून सबंधित अर्जदाराला तीन महिने चकरा मारायला लावल्या.
अखेरीस अर्जदाराने कारकुनाला फोन केल्यावर अर्जदाराला बोलवून घेण्यात आले. तेथे गेल्यानंतर त्या मामांनी फाईल शोधली आहे, त्यांचे काही तरी चहा-पाण्याचे बघा, म्हणून सांगितले. मामाकडे गेल्यावर त्या मॅडमला काहीतरी चहा-पाणी द्या, असे सांगण्यात आले.
हे ऐकून अर्जदार म्हणाला, “माझ्याकडे तुम्हाला द्यायला एक रुपयाही नाही. काय करायचे ते बघा,” असे म्हणल्यावर घाई-घाईने मॅडमनी निकालाची समज अर्जदाराला दिली.
मात्र या प्रकाराने केवळ चिरीमिरी आणि चहा-पाण्यासाठी सामान्य नागरीकांना हवेली तहसील कार्यालयातील कर्मचारी चकरा मारायला लावत असल्याचे उघड झाले. या प्रकाराने सामान्य नागरीक त्रस्त होत आहेत. सर्वसमान्यांच्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणूकीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का? असा सवाल नागरीक विचारत आहेत.
“प्रतिज्ञापत्र तीन महिन्यांपूर्वी करून दिले होते. त्यानंतर 15 दिवसांनी यायला सांगितले. त्यानंतर अनेक वेळा वेगवेगळी कारणे सांगून अनेक वेळा चकरा मारायला लावल्या. त्यानंतर फाइल हरवली असल्याचे सांगण्यात आले. अन आज आल्यावर फाईल शोधली म्हणून चहा-पाणी मागत होते. म्हणजे यांच्या चहा-पाण्यासाठी हे आम्हाला चकरा मारायला लावतात.”
-अर्जदार
याबाबत हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.