शिवभूमी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 29 : आपल्या अंगातील कलागुण दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ, त्या व्यासपीठावर नृत्य, गायन, नाटके अशी एकापेक्षा एक सरस कला सादर करणारे विद्यार्थी आणि गुलाबी थंडीत आपल्या पाल्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या केलेला दाद देणारे पालक आणि शिक्षक असा खेड-शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कलाविष्कार शनिवारी रात्री कोंढणपूर येथे रंगला.
शिवभूमी मंडळ संचालित शिवभूमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी कोंढणपूर येथील राधिका लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज व संस्थापक श्री. शिवाजीराव कोंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे अवधूत गांधी यांनी शिवराय अष्टक या चित्रपट मालिकेतील काही शिवगीतांचे सादरीकरण केले. यावेळी गांधी, संस्थेचे सचिव संग्राम कोंडे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयातील शैक्षणिक वर्षात जिल्हा स्तरीय कबड्डी,कुस्ती,तायकांन्दो या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार महाविद्यालय विभागप्रमुख खोडदे सर यांना देण्यात आला.
पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर उत्कृष्ट सादरीकरण केले.
यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत,पंजाबी सॉंग, रेट्रो सॉंग, साउथ इंडिअन सॉंग, मराठी रिमिक्स, आसामी सॉंग, हिंदी रिमिक्स या गाण्यांवर नृत्ये सादर केले. मनोरंजनासोबत ऐतिहासिक व सामाजिक जागृती या विषयांवरही नृत्य व नाटिका सादर केल्या गेल्या.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे, सचिव संग्रामदादा कोंडे, रवींद्र जगताप, प्रताप नाना कोंडे, राजेंद्र कोंडे, मनोज काका कोंडे, सतीश दादा कोंडे, स्वप्निल जगताप, अमोल कोंडे, शंकर कोंडे, विश्वनाथ मुजुमले, उमेश तात्या कोंडे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांबळे सर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा कोंडे व दीक्षित सर यांनी केले.