नवीन सेवा रस्त्यासाठी खेड-शिवापूर भागात नव्याने भू-संपादन होणार नाही

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 8 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित खेड-शिवापूर ते रावेत या नवीन सेवा रस्त्यासाठी खेड-शिवापूर भागात नव्याने कोणतेही भू संपादन होणार नाही. तर या भागातील सेवा रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे,” अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरीष्ठ अभियंता सुभाष घंटे यांनी ‘पुणे फास्ट 24 न्यूज’शी बोलताना दिली.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी खेड-शिवापूर ते रावेत या सुमारे 32 किमीच्या नवीन सेवा रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड भागातील सुमारे 90 टक्के भू संपादन पूर्ण झाले असून मार्च मध्ये या नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर खेड-शिवापूर भागातही नव्याने भू-संपादन होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे येथील स्थानिक नागरीकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधला असता खेड-शिवापूर भागात नव्याने कोणतेही भू-संपादन होणार नाही, असे सांगण्यात आले.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरीष्ठ अभियंता सुभाष घंटे म्हणाले, “खेड-शिवापूर भागातील दोन्ही बाजूचा सेवा रस्ता येथील ड्रेनेजच्या पाण्यामुळे वारंवार खराब होत आहे. त्यामुळे येथील सेवा रस्ता कॉंक्रीटचा करण्यात यावा, असा प्रस्ताव आम्ही पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे खेड-शिवापूर भागात कोणतेही नव्याने भू-संपादन करण्यात येणार नाही. तर आहे त्या सेवा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. भू संपादनाची प्रक्रिया पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात होईल.”