अशोक गोगावले यांनी भर दुपारी विझवला वणवा

मोठे क्षेत्र आग लागण्यापासून वाचले
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 9 : गोगलवाडी (ता.हवेली) येथील डोंगरावर शनिवारी भर दुपारी लागलेली आग गोगलवाडीचे माजी सरपंच अशोक गोगावले आणि भरत गोगावले यांनी सुमारे एक तास प्रयत्न करून विझवली. त्यामुळे मोठे डोंगर क्षेत्र आग लागण्या पासून वाचले. तसेच अनेक लहान-मोठ्या वन्य प्राण्यांचे जीव वाचले.
अशोक गोगावले हे शनिवारी दुपारी येथील डोंगरातील घाट रस्त्याने चतुर्मुख महादेव मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. यावेळी येथील डोंगरावर त्यांना आग लागल्याचे दिसले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता होती. हे ओळखून अशोक गोगावले यांनी भरत गोगावले यांच्या मदतीने झाडांच्या फांदया घेऊन ही आग विझविण्यास सुरुवात केली. सुमारे एक तासानंतर त्यांनी ही आग संपूर्ण विझवली.
गोगावले यांच्या या प्रयत्नामुळे येथील मोठे डोंगर क्षेत्र आग लागण्यापासून वाचले. तसेच अनेक झाडे-झुडपे आणि वन्य प्राण्यांचे जीव वाचले. त्यामुळे गोगावले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.