निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे भोर तालुक्यात लागले फलक
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 18 : एकीकडे 4 जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काय असणार? याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्यात मात्र सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. सुप्रिया सुळे यांचा विजय पक्का असल्याने आम्ही त्यांच्या विजयाचे फलक लावले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुका शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे यांनी व्यक्त केली.
देशातील लोकसभा निवडणुका सुरु आहेत. अनेक ठिकाणी मतदान झाले आहे तर अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे. येत्या 4 जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे 4 जून रोजी नक्की काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अतिशय लक्षवेधी आणि चुरशीची झाली आहे. त्यात नक्की कोण बाजी मारणार? बारामतीचा गड कोण काबीज करणार? याची उत्सुकता नागरीकांना लागून राहिली आहे. बारामतीत कोण आणि कसे विजयी होणार, याचे अंदाज लावले जात आहेत. पारावार, चौकात, हॉटेलात, शेतात सर्वत्र हिच चर्चा आहे.
असे असताना पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता.भोर) गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे यांनी चक्क सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे, खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करत असल्याचे फलक लावले आहेत. “मा. सुप्रिया सुळे यांचे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.” “गुलाल आपलाच”, “विजय निश्चित”, “कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय”, असा मजकूर लिहिलेले फलक लावले आहेत. पुणे सातारा रस्त्यावरुन प्रवास करताना हे फलक प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले, “निवडणूक लागली तेव्हापासूनच सुप्रिया सुळे यांचा विजय होणार असल्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विजयाचे फलक लावले आहेत.”