खेड-शिवापूर परिसरात महावितरणचे अघोषित भारनियमन
स्थानिक नागरीक आणि व्यावसायिक त्रस्त
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 26 : कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणकडून खेड-शिवापूर परीसरात अघोषित भारनियमन सुरु आहे. या अघोषित भारनियमनामुळे या परीसरातील व्यावसायिक आणि नागरीक त्रस्त झाले आहेत. स्थानिक महावितरण अधिकारी आणि वरिष्ठ महावितरण अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही या परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही.
सुमारे दोन महिन्यापासून खेड-शिवापूर परिसरात हा विजेच्या लपंडावाचा सावळा गोंधळ सुरु आहे. दिवसभरात कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरण कडून कधीही वीज पुरवठा बंद केला जातो. एकदा वीज गेली की सुमारे पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद ठेवण्यात येतो.
विशेष म्हणजे गुरुवार वगळता इतर दिवशी वीज पुरवठा बंद होणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना ग्राहकांना देण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांचे, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कधीही वीज जात असल्याने त्यांना कामाचे नियोजन करता येत नाही. याबाबत येथील महावितरण अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यात काहीही फरक पडलेला नाही. विशेष म्हणजे याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे.
या भागात पुरेसा वीज भार नसल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या भागात वीज भार पुरेसा असूनही भारनियमन का केले जात आहे, याची माहिती घेण्यात येईल, असे उत्तर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नक्की काय खरे आणि काय खोटे? असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे.