बाप समजून घेताना उपस्थितांच्या डोळ्यात पाणी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 13 : उमगायला अवघड असणारा बाप त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना अगदी सोपा करून सांगितला. इतकेच नाही तर आपल्या आई-वडिलांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आई आणि बापाचं आपल्या जीवनातील महत्व अधोरेकित करतानाच शालेय जीवनात खोट्या प्रेमाकडे आकर्षित होणाऱ्या मूली आणि व्यसनांकडे वळणाऱ्या मुलांचे त्यांनी कान उपटले. बाप आणि आई समजून घेताना साऱ्या उपस्थितांचे डोळे पाणावले.
निमित्त होते, शिवभूमी शिक्षण मंडळ आणि श्री रमेश बापू कोंडे मित्र परीवार यांच्यातर्फे ज्येष्ठ व्याख्याते वसंत हंकारे यांच्या आयोजित केलेल्या व्याख्यानाचे.
यावेळी ‘बाप समजून घेताना’ याविषयी व्याख्यान देताना हंकारे बोलत होते. आई आणि वडील यांचे आपल्या जीवनात देवापेक्षा महत्वाचे स्थान आहे. मात्र असे असतानाही आपण आई-वडिलांना हलक्यात घेत असतो. आपले जीवन सुसह्य होण्यासाठी आई-वडील काबाड कष्ट करत असतात. आपली स्वप्ने बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी झटत असतात. त्या आई बापाला समजून घ्या. त्यांच्या कष्टाचा, तुमच्या विषयी त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाचा विचार करा. त्यांचे कष्ट विसरु नका. खूप शिका, मोठे व्हा, जग मुठीत घ्या पण त्या मुठीत आपल्या देशाची माती आणि आई वडील असू द्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
त्याचवेळी शालेय जीवनात नको त्या खोट्या प्रेमाकडे आकर्षित होणाऱ्या मूली आणि व्यसनांकडे वळणारी मुले यांचे त्यांनी कान उपटले. आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल, असे वागू नका, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
हंकारे यांच्या तोंडून बाप समजून घेताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. अनेक विद्यार्थीनिंनी व्यासपीठावर येऊन आई आणि बाप यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवभूमी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे, सचिव संग्राम कोंडे, कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, प्रमिला निकम आदी यावेळी उपस्थित होते.