चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे फास्ट 24 न्यूजपुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील या फेलोशिप अंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर) , साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाणार आहे.

कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर इच्छुकांनी १८ जुलै ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करावेत. १८ ऑक्टोबर २०२४ नंतर स्वीकारले जाणार नाहीत. आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तपासणी होऊन निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ साठी १२ तर शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण १२२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी फेलोशिपच्या वेबसाईटवर केली जाईल. दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना सन्मानपूर्वक फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.

कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळाल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व फेलोंचे आभार मानले असून तिन्ही वर्षी फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. निवड झालेले सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत याचे आम्हाला समाधान आहे व त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!