ड्रेनेज तुंबल्याने वेळू फाट्यावर रस्त्यावर पाणी; दुर्गंधी पसरत असल्याने नागरीक त्रस्त
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 8 : पुणे सातारा रस्त्यावर वेळू फाटा (ता.भोर) येथील सेवा रस्त्यावरील ड्रेनेज तुंबले आहेत. त्यामुळे याठिकाणी सांड़पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरले असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून याबाबत तक्रार करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
पुणे सातारा रस्त्यावर वेळू फाट्यावर सातारा बाजूने पुणे बाज़ुकडे जाताना सेवा रस्त्यालगतचे अनेक ड्रेनेज तुंबले आहेत. त्यामुळे या ड्रेनेज मधून पाणी वाहून जात नाही. हे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. वेळू फाटा ते खेड शिवापूर पोलिस चौकीपर्यंत हे पाणी वाहत जाते. त्यामुळे येथील रस्त्यावर खड्डे पडले असून पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या भागात नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे तुंबलेले ड्रेनेज दुरुस्त करावेत, अशी मागणी स्थानिक नागरीक गेल्या सहा महिन्यांपासून करत आहेत. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
याबाबत रिलायन्स इन्फ्राचे राकेश कोळी म्हणाले, “या तुंबलेल्या ड्रेनेजची पाहणी करून ताबड़तोब ड्रेनेज साफ करण्यात येतील.”