‘अंड्या’चा वाद 112 वर

0

पुणे फास्ट 24 न्यूज

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर, ता. 29 : काही आपत्कालीन परिस्थिती ओढावली असेल अथवा तुम्ही काही संकटात असाल तर तुम्ही 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मिळवू शकता. त्यासाठी शासनाने 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मात्र अनेकदा काही महाभाग उठसुठ कोणत्याही क्षुल्लक करणासाठी 112 वर फोन करत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून अशा प्रकारांमुळे पोलिसांचा वेळ वाया जात आहे.

तुमच्यावर कोणी हल्ला केला असेल, कोणी मारहाण करत असेल, प्रवासात असताना अपघात झाला तसेच कोणी तुम्हाला लूटत आहे, या प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही 112 वर फोन करून मदत मिळवू शकता. त्यामुळे 112 या क्रमांकामुळे अनेकांना संकट काळात ताबडतोब पोलिसांची मदत होते. मात्र अनेकवेळा काहीही शुल्लक कारणासाठी काही महाभाग 112 वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परीसरात घडला. एका हॉटेलमधून एका ग्राहक तरुणाने 112 वर फोन केला. सबंधित तरुण काहीतरी अडचणीत आहे हे समजून त्याठिकाणी पोलिस ताबडतोब दाखल झाले. तेथे जाऊन पोलिसांनी सबंधित तरुणाला विचारले की काय झाले? तर त्या तरुणाने उत्तर दिले की “मी अंडा करी मागवली होती. पण हॉटेल वाल्याने मला फक्त करी दिली अंडे दिलेच नाही.” हे ऐकून हसावे की रडावे हे पोलिसांना समजेना. तरीही त्यांनी हॉटेल मालकाला बोलावून याला अंडे का दिले नाही विचारले. तर हॉटेल मालक म्हणाला, “अहो अंडा करी दिल्याबरोबर ह्याने पटकन त्यातील अंडे खाऊन टाकले, आणि अंडे दिले नाही म्हणून आमच्याशी भांडतो आहे.”

हॉटेल मालकाचे हे उत्तर ऐकून पोलिसांनी त्या तरुणाला खडसावले आणि निघून गेले. मात्र अशा प्रकारे शुल्लक कारणासाठी 112 वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्या महाभागांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!