पश्चिम हवेली पट्टयात अनधिकृत उत्खन्नाचा सपाटा
महसूल कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बुडतोय लाखो रूपयांचा महसूल
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 8 : पश्चिम हवेली पट्टयात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन सुरु आहे. मात्र त्याकडे महसूल कर्मचारी ‘सोईस्कर’ दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या सोईस्कर दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. त्याकडे वरिष्ठ महसूल अधिकारी तरी लक्ष देणार का? असा सवाल नागरीक विचारत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम हवेली पट्टयात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरु आहे. त्यातील अनधिकृत किती आणि अधिकृत किती यबाबतही सावळा गोंधळ आहे. पुणे सातारा रस्त्यालगत असलेल्या अनेक गाऊडदरा, शिवापूर या गावातटेकडी फोड सुरु आहे. या भागात जागेला सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे डोंगर फोडून प्लॉट तयार केले जात आहेत. तर कोंढणपूर, कल्याण या पट्टयातही जोरदार उत्खनन सुरु आहे. हा उत्खननाचा असा अनधिकृत प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र तरीही येथील महसूल कर्मचारी त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहेत.
तसेच अनेक ठिकाणी बाहेरुन राडारोडा, मुरुम आणून प्लॉट भरले जात आहेत. त्याचेही कोणतेही शुल्क न भरता हा राडा रोडा आणला जातो. त्याकडेही महसूल कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बूडत आहे. त्यामुळे स्थानिक महसूल कर्मचारी लक्ष देत नसल्याने वरिष्ठ महसूल अधिकारी त्याकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरीक विचारत आहेत.
याबाबत हवेली प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.