वेळू फाट्यावरील सेवा रस्त्यावर पूरस्थिती
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 19 : येथील खेड-शिवापूर परीसराला सोमवारी सायंकाळी सुमारे एक तास जोरदार पावसाने झोडपून काढले. मेघगर्जनेसह झालेल्या या जोरादर पावसाने ओढे, नाले, भात खाचरे तुडुंब भरून वाहू लागली. इतकेच काय तर पुणे सातारा रस्त्यावर वेळू फाट्यावरील सेवा रस्ता पाण्याखाली जाऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
येथील खेड-शिवापूर परीसरात सलग तीन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर वातावरणात प्रचंड उकाडा होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हलक्या स्वरुपात पावसाला सुरुवात झाली. मात्र सायंकाळी सहा नंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. सुमारे एक तास या भागात ढगफूटी सदृश्य पाऊस झाला.
या पावसाने या भागातील जन जीवन विस्कळीत झाले. परीसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले. तर पुणे सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील सेवा रस्ता या पावसाच्या पाण्याने पाण्याखाली गेला. येथील सेवा रस्त्यावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथून वाहन चालविताना वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.