तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वाचले बसमधील प्रवाशांचे प्राण; पुणे सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथील घटना
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 31 : शिंदेवाडी (ता.भोर) येथील उड्डाणपूलावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खासगी बसने पेट घेतल्याचे पाठीमागून पुण्याकडे निघालेल्या अभयसिंह कोंडे यांनी पाहिले. कोंडे यांनी ताबडतोब बसला ओव्हरटेक करून बस थांबवली व प्रवाशांना बाहेर काढले. अजून दोन मिनिटे उशीर झाला असता तर बोगद्यात जाऊन बसने पेट घेतला असता. मात्र कोंडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी (ता.भोर) येथील उड्डाणपूलावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी या बसच्या पाठीमागून कारमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयसिंह कोंडे हे पुण्याकडे निघाले होते. मात्र कोंडे यांना बसच्या पाठीमागून मोठ्या प्रमाणात धुर येत असल्याचे दिसले. त्याबरोबर कोंडे यांनी ताबडतोब बसला ओव्हरटेक करून बस थांबवली व चालकाला बस बंद करण्यास सांगितले व बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
बस बंद झाल्याने बसची पेट घेण्याची जी अवस्था सुरु झाली होती ती बंद झाली आणि धुर येण्याचे थांबले. बस कात्रज नवीन बोगद्यात प्रवेश करण्यासाठी केवळ दोन मिनिटांचे अंतर राहिले होते. बोगद्यात बसने प्रवेश केला असता तर बसने पेट घेतला असता. मात्र कोंडे यांच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले आणि बसचे होणारे नुकसान टळले.
अभयसिंह कोंडे म्हणाले, “माझ्यासमोर सुसाट वेगात निघालेल्या बसच्या पाठीमागून धुर येत होता. त्या बसने पेट घेतल्याचे माझ्या लक्षात आले. बस बोगद्यात प्रवेश करण्यास काहीच अंतर राहिले होते. बोगद्यात पेटती बस गेली तर मोठा अनर्थ घडू शकतो हे लक्षात आल्याने बसला थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. बस बंद झाल्याने इंजिन बंद होऊन आग लागलेली प्रक्रिया थांबली.”