उमेदवारी मिळेल त्याचे काम एक दिलाने करणार
भोर विधानसभा मतदार संघातील महायुतीचा निर्धार
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 21 : “महायुतीतील पक्षश्रेष्ठी भोर विधानसभा मतदार संघात ज्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देतील; त्याचे काम आम्ही एकदिलाने करू. तसेच भोरमध्ये यावेळी परीवर्तन करू,” असा निर्धार भोर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भोर विधानसभा मतदार संघाचा विकास होण्यासाठी यंदा भोरमध्ये परिवर्तन घडवू, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. माजी आमदार शरद ढमाले, कुलदीप कोंडे, रणजीत शिवतारे, चंद्रकांत बाठे, अमोल पांगारे, दिपक करंजावणे, किरण राऊत, यशवंत डाळ, बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, राजाभाऊ रेणुसे, राजाभाऊ वाघ, प्रकाश तनपुरे, सुधीर शेडगे, महेंद्र भोरडे, दिपक बर्डे, विकास चव्हाण उपस्थित होते.
भोर विधानसभा मतदार संघात अनेक जण आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महायुतीतील वरिष्ठ भोरमध्ये ज्या पक्षाला उमेदवारी देतील. त्या उमेदवाराचे काम आम्ही महायुतीतील सर्व घटक पक्ष एक दिलाने करू, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर भोर तालुक्यातील राजगड कारखाना अडचणीत आहे. कारखान्यातील कामगारांचे पगार थकले आहेत. भोर मधील प्रस्तावित ‘एमआयडीसी’चे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. भोर मतदार संघात अनेक किल्ले असून पर्यटनाच्या दृष्टीने काहीही विकास झालेला नाही. आदी मुद्दे या निवडणुकीत जनते समोर घेऊन जाणार असल्याचे यावेळी उपस्थित महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.