पाच कोटी रकमेचा गुंता सूटेना
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 22 : राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनातून नेण्यात येणारी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. मात्र ही रक्कम कोणाची होती? कुठे आणि कशासाठी घेऊन चालले होते? याप्रकरणी गुन्हा दाखल आहे काय? याची उतरे अजूनही गुलदस्तात आहेत. त्यामुळे एकूणच प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका निर्माण होत आहे.
पुणे सातारा रस्त्याने रोख रक्कम घेऊन एक कार गाडी जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी राजगड पोलिसांनी पाच कोटी रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन ताब्यात घेतले.
मात्र त्यानंतर ही रक्कम कोणाची होती? कुठे आणि कशासाठी घेऊन चालले होते? या सर्व गोष्टी समोर येण्यास दूसरा दिवस उजाडला. तरीही पोलिसांकडून याबाबत सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. केवळ ही रक्कम आयकर विभागाकडे सुपुर्द करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास सुरु असल्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
त्यातच बाळासाहेब आसबे आजबे नावाच्या एका ठेकेदाराने ही पाच कोटी रोख रक्कम आपली असल्याचा दावा केला आहे. हे पैसे घेऊन जाणारी गाडी अमोल नलावडे या व्यक्तीच्या नावावर आहे. मात्र आपण ही गाडी आसबे यांना विकली असल्याचा दावा नलावड़े यांनी केला आहे. गाडी विकली फक्त ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया केली नसल्याचेही नलावड़े यांचे म्हणणे आहे.
यानिमित्त उपस्थित होणारे प्रश्न
नोटा मोजण्याअगोदर ती रक्कम 5 कोटी आहे, हे कसे समजले?
हे पैसे कोठून आणले आणि कोठे नेण्यात येत होते?
गाडी सांगोल्याची तर मग ती गाडी पुणे सातारा रस्त्याने जाण्याचे कारण काय?
ठेकेदार असलेल्या आसबे हे 5 कोटी रक्कम आपली असल्याचा दावा करतात. मग नलावडे यांच्याकडून जूनी गाडी का विकत घेतात?