सोयाबीन भरडणाऱ्या मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यु
भोर तालुक्यातील कुसगाव येथील घटना
पुणे फास्ट 24 न्यूज
खेड-शिवापूर, ता. 23 : कुसगाव (ता. भोर) येथे सोयाबीन भरडणाऱ्या मशीनच्या पट्टयात साडीचा पदर गुंतून एक महिला मशीनमध्ये अडकण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. या अपघातात रंजना दत्तात्रेय गोरे (वय 35) या महिलेचा मृत्यु झाला.
याबाबत बाळू नामदेव गोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी माहिती दिली. कुसगाव येथे राहणाऱ्या रंजना गोरे यांच्याकडे बुधवारी सकाळी सोयाबीन भरडण्यासाठी सोयाबीन भरडा मशीन आले होते. रंजना या या मशीनमध्ये सोयाबिन भरडण्याचे काम करत होत्या. यावेळी रंजना यांचा पदर या मशीनच्या पट्टयात अड़कून त्या मशीनमध्ये अडकल्या. या अपघातात त्यांच्या संपूर्ण शरीराला जखमा झाल्या.
स्थानिक नागरीकांनी रंजना यांना मशीनमधून बाहेर काढून उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी रंजना यांना तपासून मृत घोषित केले.