शिवरे येथे अपघातात तीन जण जखमी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 26 : शिवरे (ता. भोर) येथे पुणे सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळी दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जीप गाडी धडकून अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. शनिवारी सकाळी काही जण मांढरदेवी येथून दर्शन घेऊन पुण्याकडे मोटारगाडीने निघाले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवरे (ता. भोर) येथून ते जात होते. यावेळी येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामामुळे येथील वाहतूक वळणाजवळ मधल्या दुभाजकाला लागून मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. त्याला धडकून ही जीपगाडी हवेत उडून उलटली. या गाडीत एकूण सात जण होते. त्यातील एक जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्याबरोबर शेजारील पेट्रोल पंपातील कामगार आणि स्थानिक नागरीकांनी जीपमधील प्रवाशांना बाहेर काढले. तर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातात या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने वाहतूक वळण असल्याने येथे रिफ्लेक्टर, दिवे, फलक लावणे आवश्यक होते. मात्र अशी कोणतीही खबरदारी येथे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरीक सांगतात.
महामार्ग पोलिसांचे वरातीमागून घोडे
महामार्गावरील प्रवाशांच्या सुखरूप आणि सुरक्षित प्रवासासाठी दक्ष हे महामार्ग पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र शनिवारी शिवरे येथील अपघात झाला. या अपघातातील प्रवाशांना स्थानिक नागरीकांनी बाहेर काढले. तर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी दक्ष असलेले महामार्ग पोलिस आणि राजगड वाहतूक विभाग घटनास्थळी आले नव्हते. अपघाता घडून एक तासांनी महामार्ग पोलिस अपघातस्थळी आल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले.