यावेळी भोरची लढाई थोपटेंना सोपी नसणार
भोरमध्ये महायुतीकडून मांडेकरांना उमदेवारी दिल्याने चर्चा
पुणे फास्ट 24 न्यूज
खेड-शिवापूर, ता. 29 : भोर विधानसभा मतदार संघात महायुतीने उशीरा उमेदवारी जाहीर केली खरी. मात्र महाविकास आघाडीचाच उमेदवार फोडत जबरदस्त खेळी करत महायुतीने शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यावेळी भोर विधानसभेच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला असून थोपटे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे यावेळी थोपटे यांना भोरची लढाई सोपी नसणार, अशी चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे.
भोर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी केव्हाच जाहिर झाली. तसेच आमदार संग्राम थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला देखील. मात्र तरीही महायुतीने भोरमध्ये उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे महायुती कोणाला उमेदवारी देणार? याबाबत नागरीकांमध्ये उस्तुकता होती. मात्र महायुतीने उशीरा उमेदवारी जाहिर केली. परंतु महायुतीतील कोणत्याही पक्षाला उमेदवारी न देता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शंकर मांडेकर यांना महायुतीत घेऊन त्यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे भोर विधानसभेच्या मतदार संघाच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे यावेळी भोर विधानसभेची लढाई संग्राम थोपटे यांना सोपी नसणार आहे. अशी चर्चा भोर विधानसभा मतदार संघात रंगू लागली आहे.
भोर, राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा विचार केला तर मुळशीमधील मतदान जास्त आहे. तसेच मुळशीकर उमेदवार मिळाल्याने यंदा महायुतीचा उमेदवार मुळशीत जास्त मताधिक्य घेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर भोर आणि राजगड या तालुक्यातही महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असे नागरीकांचे म्हणणे आहे.
अजित दादांचा डायलॉग भोरमध्ये खरा होणार का?
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार एकदा भोरच्या दौऱ्यावर होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावलेल्या साउंड सिस्टीमवर “आख्य्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एकदा ठरवलं एखाद्याला आमदार करायचं नाय तर कोणाच्या बापाला ऐकत नाय,” हा अजित दादांचा डायलॉग वाजविण्यात येत होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “दादा, भोरमध्ये तुमचा हा डायलॉग खरा करा,” अशी विनंती केली होती. त्यामुळे आता भोरमध्ये अजित दादांचा डायलॉग खरा होणार का? याबाबत नागरीकांमध्ये उस्तुकता आहे.