ग्रामीण भागाच्या विकासासाठी खडकवासल्यात परिवर्तन झाले पाहिजे
शिवगंगा खोऱ्यातील अनेक मतदारांची भावना
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 8 : “खडकवासला विधानसभा मतदार संघाचा विकास व्हायचा असेल तर यावेळी खडकवासल्यात परिवर्तन झाले पाहिजे. परिवर्तन झाले तरच या मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास होईल,” असे मत खड़कवासला विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.
शिवगंगा खोरे या खेड-शिवापूर भागातील अनेक गावांचा खडकवासाला विधानसभा मतदार संघात समावेश होतो. मात्र या भागाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. या भागात पुण्यातील उद्योग व्यवसाय स्थलांतर होऊन या भागात स्थिर झाले आहेत. मात्र त्या उद्योग व्यवसायांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा मिळत नाही. त्यामुळे हे उद्योजक त्रस्त झाले आहेत. तसेच रोजगाराच्या शोधात या भागातील अनेक तरुणांना पुणे शहरात जावे लागत आहे.
या भागात तरुण वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्सची सुविधा नाही. त्यामुळे इच्छा असूनही तरुण मुलांना वेगवेगळ्या खेळाचा सराव करता येत नाही. त्यामुळे या भागात मुलांसाठी खेळाच्या सुविधा असलेले कॉम्लेक्स व्हावे, अशी मागणी नागरीक करत आहेत.
पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभारण्यासाठी शिवापूर गावात सुमारे पाच एकर जमीन देण्यात आलेली आहे. मात्र अद्याप त्याठिकाणी उपबाजार उभारण्यास मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग येथील उपबाजार सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
या सर्व गोष्टी सुरु होऊन शिवगंगा खोऱ्याचा विकास व्हायचा असेल तर यावेळी खड़कवासला विधानसभा मतदार संघात परिवर्तन झाले पाहिजे, असे मत या भागातील नागरीक व्यक्त करत आहेत.