रस्त्यावरील मातीच्या ढिगामुळे अपघात
महिन्यातील दुसरा अपघात, तरीही ‘एनएचएआय’चे दुर्लक्ष
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 28 : पुणे सातारा रस्त्यावर गुरुवारी पहाटे शिवरे (ता. भोर) येथे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला धड़कून मोटारगाडी उलटून अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र गेल्या महीनाभरात याठिकाणी टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे हे अपघात झाले आहेत. मात्र तरीही संबंधित उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
याबाबत प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी माहिती दिली. शिवरे येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामामुळे पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली आहे. त्याठिकाणी अलीकडील बाजूला रस्त्याच्या मध्ये मातीचा ढिग आहे. गुरुवारी रात्री दीड वाजता पुण्याकडे जाणारी एक मोटारगाडी या ढिगाला धडकली. यावेळी त्या मोटारीने रस्त्यावर तीन-चार पलट्या खाल्ल्या. हा अपघात पाहून शेजारील पेट्रोल पंपावरील कामगारांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या वाहनात सहा प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र अनेकांना किरकोळ जखमा आणि मुका मार लागला आहे.
सदर ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असल्याचे फलक, दिवे, रिफ्लेक्टर काहीही लावण्याची तसदी ठेकेदाराने घेतलेली नाही. तसेच याठिकाणी टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगामुळे गेल्या महीनाभरात याठिकाणी झालेला हा दुसरा अपघात आहे. मात्र अद्याप हा मातीचा ढिग हटविणे, तसेच सदर ठिकाणी आवश्यक दिवे, फलक लावण्याची तसदी ठेकेदाराने घेतलेली नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही त्याकडे दुर्लक्ष करत आहे.