पुणे सातारा रस्त्यावरील तोडलेले दुभाजक बनलेत जीवघेणे
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 1 : “पुणे सातारा रस्त्यावर बेकायदा तोडलेले दुभाजक जीवघेणे झाले आहेत. या तोडलेल्या दुभाजकांमुळे अपघात होत आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. भविष्यात या बेकायदा तोडलेल्या दुभाजकांमुळे अपघात घडल्यास त्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स इन्फ्रा आणि संबंधित व्यावसायिक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” या मागणीचे निवेदन महामार्ग पत्रकार संघातर्फे राजगड पोलिसांना देण्यात आले आहे.
पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान पुणे ते सातारा आणि सातारा ते पुणे या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी अनेक व्यावसायिकांनी बेकायदेशीर रस्त्याचे दुभाजक तोडले आहेत. या तोडलेल्या दुभाजकांमुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. तर अजूनही या बेकायदेशीर तोडलेल्या दुभाजकांमुळे अपघाताचा धोका आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
महामार्ग पोलिसही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत. महामार्ग पत्रकार संघाच्या सदस्यांनी वारंवार बातम्यांच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. मात्र तरीही त्याकडे एनएचएआय आणि रिलायन्स इन्फ्रा गांभिर्याने पाहत नाहीत. बेकायदा दुभाजक तोडल्यामुळे व्यावसायिकांचे व्यवसाय होतील, मात्र याठिकाणी अपघात होऊन कोणी मृत्युमुखी पडले तर संबंधित अपघातातील व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महामार्ग पत्रकार संघाने शनिवारी राजगड पोलिसांना याबाबत एक निवेदन दिले आहे. या बेकायदा तोडलेल्या दुभाजकांमुळे अपघात घडल्यास त्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स इन्फ्रा आणि संबंधित व्यावसायिक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच सेवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्यास एनएचएआय आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.