गाडी पंक्चर झाल्याचे सांगून फसवणूक ; पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परीसरातील प्रकार
महेंद्र शिंदे : पुणे जिल्हा, ता.29 : तुम्ही तुमच्या कारमधून पुणे सातारा रस्त्यावरुन प्रवास करत असता. खेड-शिवापूर परीसरात आलात की तुमच्या गाडीच्या बाजूला दुचाकीवरुन दोघे जण येतात. त्यातील पाठिमागे बसलेला तुमच्या गाडीच्या चाकाकडे हात करून तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगतो आणि ते पुढे निघून जातात. तुम्ही लागलीच गाडी बाजूला जवळच असलेल्या पंक्चरच्या दुकानात नेता. तिथे हवा चेक करायला सांगता तर काय तुमच्या गाडीच्या ट्यूबलेस चाकात अनेक पंक्चर निघतात. तुम्ही पंक्चर काढून पैसे देऊन त्या अनोळखी दुचाकीस्वारांचे आभार मानून निघून जाता. मात्र याचठिकाणी तुमची फसवणूक झालेली असते.
म्हणजेच तुमच्या गाडीची ना हवा कमी झालेली असते ना गाडी पंक्चर झालेली असते. तरीही तुमच्या गाडीच्या नसलेल्या पंक्चर काढल्या जातात. कारण तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी आहे हे सांगणारे तुमचे हितचिंतक किंवा कोणी समाजसेवक नसतात. तर ते तुम्ही ज्या पंक्चरच्या दुकानात गाडी घेऊन गेलेला असता त्या पंक्चर दुकानदाराचे पार्टनर असतात.
अशा प्रकारे चालत्या वाहनामध्ये हवा कमी असल्याचा बताव करून आपल्या दुकानात गाडी घेऊन येण्यास प्रवाशांना भाग पाडायचे. त्यानंतर पंक्चर नसतानाही पंक्चर काढून वाहन चालकांकडून पैसे उकळायचे, असे प्रकार पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वाहन चालकां सोबत घडत आहेत. पुणे सातारा रस्त्यावर अनेक परप्रांतीय पंक्चर दुकानदार वाहन चालकांना अशा प्रकारे फसवूण त्यांच्याकड़ून पैसे उकळत आहेत. विषेशतः परप्रांतीय आणि शक्यतो महिला वाहन चालवत असलेल्या वाहनांना ते टार्गेट करतात. अनेक जणांच्या हा प्रकार लक्षात येत नाही. किंवा आला तरी उशीर झालेला असतो. त्यामुळे कोणी याबाबत पोलिसात तक्रार करत नाहीत. त्यामुळे या फसव्या पंक्चर दुकान दारांचा उद्देश्य साध्य होतो.
“अशा प्रकारे वाहन चालकांची फसवणूक करणाऱ्यांपासून वाहन चालकांनी सावध राहावे. तसेच असा प्रकार कोणाबाबत घडल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. सबंधित फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.” राजेश गवळी – पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस स्टेशन