अवकाळी पावसाने पुणे सातारा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 16 : सुमारे एक तास झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने खेड-शिवापूर परीसराला मंगळवारी सायंकाळी झोडपून काढले. या अवकाळी पावसाने पुणे सातारा रस्त्यावर वेलू येथील सेवा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते.
मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. उकाड्याने काहिली होत होती. त्यात सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाने कांदा उत्पादक शेतकरी, आंबा पिक आणि वीटभट्टी चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या तासभर झालेल्या पावसाने पुणे सातारा रस्त्यावरील वेलू येथील सेवा रस्त्याला अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले होते. मोठ्या वेगाने पाणी उताऱ्याच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे वाहन चालक आणि नागरीक यांना येथील पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती.