जलजीवन योजनेचे थांबवलेले काम पुन्हा सुरू
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची मध्यस्थी यशस्वी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 18 : गुंजवणी धरण प्रकल्पातून जलजीवन योजनेचे काम सुरू होते. मात्र शिवरे व खोपी (ता.भोर) येथील ग्रामस्थांनी हे काम सुमारे तीन दिवसांपूर्वी बंद पाडले होते. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख तथा पीएमआरडीए चे संचालक रमेश कोंडे यांनी सदर गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यामुळे कोंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीने जलजीवन योजनेचे बंद झालेले काम पुन्हा सुरु झाले.
गेल्या काही दिवसांपासून शिवगंगा खोऱ्यात जलजीवन योजनेचे काम सुरू झाले होते. सदर योजनेची पाईप लाईन भोर तालुक्यातील शिवरे, खोपी गावातून जात होती. मात्र येथील काही ग्रामस्थांनी शेतीचे नुकसान होत असल्याचे सांगून हे काम ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यामुळे हे काम रखडणार याची भीती होती. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी येथील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. कोंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीने जलजीवन योजनेचे बंद केलेले काम पुन्हा सुरु करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्यासह शिवरे गावच्या सरपंच अमृता गायकवाड, उपसरपंच योगेश दळवी, सोपान डिंबळे, खोपीचे सरपंच तुषार कांबळे, उपसरपंच सनी शिवरकर, तसेच गुंजवणी धरण समितीचे आण्णा दिघे, उपसरपंच राजू सट्टे, भागातील सर्व गावचे सरपंच उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले, “अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सदर काम सुरू आहे. त्यामुळे योजनेचे काम बंद पडू नये यासाठी ग्रामस्थांशी चर्चा केली. कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची सदर ठेकेदाराकडून काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे सर्व गावातील पाण्याच्या टाक्यांसाठी जागा अंतिम झाल्या असून लवकरच शिवगंगा खोरे पाणी टंचाई मुक्त होईल.”