डमी आडत्यांकडून शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीची दुप्पट दराने विक्री
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अजब प्रकार
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 17 : शेतकऱ्यांच्या कोथींबीरीला मिळतोय 10 ते 35 रुपये भाव. अन त्याच ठिकाणी डमी आडते ग्राहकांना विकताय 50 ते 60 रूपयांना कोथिंबीर गड्डी. हा अजब प्रकार आहे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतला. हा प्रकार म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांची एक प्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. हा प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला दिसत नाही की; समिती त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बजारभाव मिळवून देणे, या उद्दिष्टाने कृषी उत्पन्न बाजर समित्या कार्यरत असतात. मात्र पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला तेजी असूनही कवडीमोल किंमत आणि शेतकऱ्यांकडून माल घेऊन तेथेच विकणारे डमी आडते मात्र तोच शेतीमाल दुप्पट किमतीने विकत असल्याचे रविवारी दिसून आले. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती नक्की कोणाचे हित पाहत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या जून महिना सुरु आहे. पाऊस पडल्याने शेतमालाचे भाव वधारले आहेत. त्यातही कोथींबरीच्या भावात जास्त वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतील पालेभाजी बाजारात नक्की शेतकऱ्यांच्या कोथींबरीला किती भाव मिळतोय याचा आढावा घेतला. यावेळी मार्केटमध्ये आडत्यांच्या गाळ्यासमोर खुलेआम डमी आडते किरकोळ भाजीपाला विकत होते. यावेळी ते 50 ते 60 रूपयांना कोथींबर गड्डी विकत होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कोथींबरीचा मार्केटमध्ये खरेदी दर किती याची माहिती घेतली. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकेतस्थळावर रविवार (ता.16) चा कोथींबरीचा भाव गड्डीला 10 ते 35 रुपये ईतका होता. तर मार्केटमध्ये शेतकऱ्यांची कोथींबीर 10 ते 35 रूपयाला खरेदी केली जात होती. तर डमी आडत्यांकडून तीच कोथींबीर गड्डी 50 ते 60 रूपयांना विकण्यात येत होती. यावरून पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाचे हित पाहत आहे? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
याविषयी नवविकास यवुक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पवार म्हणाले, “तेजी असो वा मंदी कायम शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव दिला जातो. तर त्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतमालावर आडते आणि डमी आडते मालामाल होत आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने समितीतील हे डमी आडते बंद करावेत, या मागणीसाठी आम्ही समितीला निवेदन देणार आहोत.”
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांना याबाबत विचारले असता, “सबंधित प्रकाराची माहिती घेऊन आपणास कळवतो,” असे उत्तर त्यांनी दिले.