साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे
पुणे फास्ट २४
मुंबईः दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे राष्ट्रीय पुरस्कार विजेते. बबन, ख्वाडा या सिनेमांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. नुकतच त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. कऱ्हाडे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हि माहिती सोशल मीडियात पोस्ट दिली.
१९५९ साली प्रकाशित झालेली अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली ‘फकिरा’ कादंबरी आहे. मातंग समाजातील तरुणाच्या आयुष्यावर बेतलेल्या या कादंबरीने त्या काळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजही कित्येक जण ‘फकिर’ कादंबरी आवर्जून वाचतात. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या फकिराच्या कथेने सगळ्यांनाच आपलंस केलं होतं. आता ही कथा प्रेक्षकांना रुपेरी पडदयावर पाहायला मिळणार आहे.
या सिनेमात कोणते कलाकार? सिनेमाचं चित्रीकरण कधी सुरु होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भाऊरावांची खासियत म्हणजे नवीन चेहऱ्यांना संधी देणं. त्यामुळे या सिनेमात नवीन कोणते कलाकार पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीलं आहे.
“मराठी साहित्यामध्ये मानाचं पान असलेला आणि महाराष्ट्राच्या मातीला भुरळ घालणारा विषय म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा “फकिरा”… आपल्या आशीर्वादाने घेऊन येतोय… हर हर महादेव.” अशी पोस्ट सोमवारी भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुकवर अशी पोस्ट केली आणि २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होईल, असं पोस्टरवर नमूद केलं आहे.
या आधी भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा, बबन, हैदराबाद कस्टडी आणि टीडीएम या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ख्वाडा या सिनेमासाठी कऱ्हाडे यांना परीक्षकांतर्फे देण्यात येणारा विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. या सिनेमात भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, प्रशांत इंगळे आणि अनिल नगरकर यांची मुख्य भूमिका होती.