अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची कारवाई
एकूण 27 ठिकाणी कारवाई, 18 जणांना अटक, सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 21 : निवडणूक आचार संहिता कालावधीत अवैध हातभट्टी निर्मिती व वाहतुकीवर कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग यांनी आत्तापर्यंत एकूण सुमारे 10 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण 27 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवड यांनी दिली.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील सासवड विभागांतर्गत पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी आणि हवेली तालुक्याचा काही भाग असे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात विभागामार्फत विविध ठिकाणी गस्त घालून, वाहन तपासणी नाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी केली जाते. हॉटेल व धाबा चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अवैध मद्यविक्री अथवा सेवन करताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार विभागामार्फत आत्तापर्यंत या कार्यक्षेत्रात एकूण 27 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत सुमारे 10 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व मद्यविक्री दुकानांच्या दैनंदिन मद्यविक्रीवर ऑनलाइन प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे निरीक्षक एस. एस. बर्गे, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, प्रदीप मोहिते, सहाय्यक दुय्यम निबंधक संदीप मांडवेकर, जवान सर्वश्री रणजीत चव्हाण, रामेश्वर चावरे, सुनील कुदळे, दत्तात्रेय पिलावरे, अंकुश कांबळे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पोलिस व विशेष पथक, राज्य उत्पादन शुल्क यांनी वेळोवेळी सहभाग घेतला.